Poetics आणि ६ संप्रदायांचा एखाद्या काव्यावरील विचार.
Poetics आणि ६ संप्रदायांचा एखाद्या काव्यावरील विचार.
Mind without fear
Where the mind is
without fear and the head is held high;
Where knowledge is
free;
Where the world has
not been broken up into fragments by narrow domestic walls;
Where the words come
out from the depth of truth;
Where tireless striving
stretches its arms towards perfection;
Where the clear
stream of reason has not lost its way into the dreary desert sand of dead
habit;
Where the mind is led
forward by thee into ever-widening thought and action -
Into that heaven of
freedom, my Father, let my country awake.
by Rabindranath Tagore
'शिष्यते अनेन इति शास्त्रम् |' काव्य ही एक कला आहे आणि याचं शास्त्र म्हणजे काव्यशास्त्र. पाश्चात्य साहित्यामध्ये यालाच poetics असं म्हणतात. पाश्चात्य साहित्यक्षेत्रामध्ये अनेक काव्यशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यापैकी Horace आणि Longinus या दोन काव्यशास्त्रज्ञ तसेच तत्त्वज्ञ यांच्या काव्यशास्त्रातील काही नियम वरील कवितेमध्ये कशा पद्धतीने दिसतात याचा संक्षिप्त विचार केला आहे. त्यासोबतच संस्कृत काव्यशास्त्रातील ६ संप्रदायांचा विचार सुद्धा केला आहे.
Horace ने कवीची काही लक्षणे सांगितली आहेत. कवी हा मानवजातीसाठी सभ्यतेचे प्रतीक आहे. निश्चितच, रवींद्रनाथ टागोर हे संपूर्ण जगासाठी केवळ सभ्यतेचे प्रतीकच नव्हे तर प्रेरणादायी सुद्धा आहेत. त्यांच्या साहित्यातून त्यांनी नेहमी वय, काळ, मर्यादा यांना ओलांडून माणूस आणि माणुसकीला आवाहन केलेले दिसते. या कवितेमध्ये त्यांनी त्यांना अपेक्षित असलेले भारताचे व भारतवासीयांचे जीवन मागितले आहे ज्यामध्ये चित्त हे बंधनमुक्त असावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. Horaceने पुढचे लक्षण सांगितले आहे ज्यामध्ये तो म्हणतो की कवी हा उत्तम सल्लागार असतो. त्याच्याकडे सन्मान आणि प्रसिद्धी सहसा येत नाहीत. टागोरांच्या बाबतीत दोन्ही गोष्टी खऱ्या असल्या तरी सन्मान आणि प्रसिद्धी या दोन गोष्टींसाठी, एक कवी म्हणून, टागोर कधीच झटले नाहीत हे देखील तितकेच खरे.
Horaceने नमूद केलेली कवीची काही कामे देखील येथे लागू होताना दिसतात. कवीने सतत उत्तमोत्तम होण्यासाठी प्रयत्न करावा; कधीच कुठलीही कलाकृती जेमतेम करून सोडून देऊ नये. टागोरांची ही एकच कविता नव्हे तर 'गीतांजली' हा संपूर्ण ग्रंथ उच्चतम दर्जाचा आहे. यासोबतच, कुठलेही उत्तम कवी त्यांनी केलेलं काम अगदी सहज असल्यासारखं भासवतात. त्यांची कुठलीही कलाकृती ही दोषरहित असते. 'Mind without fear' ही कविता तितकीच सहजरित्या टागोरांच्या मनातील भावना सगळ्यांपर्यंत पोचवते.
Horaceच्या मते कुठल्याही विषयाची स्वतःची शैली असावी जी त्या विषयामध्ये मूलभूत आहे. तो विषय मांडताना कवीचे लेखन हे अतूट असावे आणि क्रियांची एकता, पात्र आणि रस हे स्पष्ट कळावेत. टागोरांची लेखनशैली उत्स्फूर्त भासते. विशेषकरून, ही कविता देशहितार्थ असल्यामुळे या मधील विचारांचा प्रवाह अतूट आहे. रस आणि अभिप्रेत असलेली कवीची मनःस्थिती दोन्ही त्या प्रवाहात जाणवते. यानंतर, कुठल्याही विषयाचा स्वतःचा छंद असावा असे Horaceचे मत आहे. ही कविता जरी प्रासबद्ध नसली तरी त्या मध्ये एक विशिष्ट लय आहे जी त्या कवितेच्या शांत परंतु तेजस्वी अशा विचारांना पूरक आहे.
Horace सांगतो की कवितेचा शेवट हा लोकांना आनंद तसेच उपदेश देणारा हवा. ही कविता या नियमाला पूर्णपणे साजेशी आहे असं मला वाटतं. शेवटी, Horaceच्या मते कविता ही आटोपशीर व वास्तवाला धरून असावी. वरील कवितेमध्ये टागोरांनी कमीतकमी शब्दात जास्तीतजास्त आशय पोचवलेला दिसतो. वास्तविक परिस्थिती पेक्षा वेगळा देश आणि माणूस त्यांना हवा आहे हा विचार त्यांनी उत्तम पद्धतीने मांडलेला आहे.
Longinus नावाचा एक ग्रीक काव्यशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याच्या मते उदात्तता अर्थात sublimity हे काव्यात निश्चितपणे असावं. उदात्त म्हणजे कुठल्याही लिहिलेल्या कलाकृतीमध्ये कवीचा उद्देश हा भावना, मानवी परिस्थिती, साहित्यिक विषय आणि या सगळ्यांचा योग्य मिलाफ करून उत्तम लिखाण करणे. उदात्तता ही कुठल्याही वाचकाला त्या शब्दांबरोबर स्वैर घेऊन जाते. उदात्तता जर योग्य रित्या वापरली गेली, तर कवितेचा आशय हा वाचकापर्यंत अगदी झटकन पोचतो. उदात्तता सगळ्याच वाचकांना नेहमी भावते. त्यामुळे, उदात्ततापूर्ण काव्य हे वाचकाला नेहमी भरभरून आनंद देतं. टागोरांच्या सगळ्याच लिखाणात उदात्तता जाणवते. वरील कवितेतील शब्द हे विशिष्ट लयीमध्ये बांधले गेले असल्यामुळे ते वाचताना आशय लगेच पोचतो. 'Where the mind is
led forward by thee into ever-widening thought and action' विशेषकरून, या वाक्यामुळे संपूर्ण कवितेचा उद्देश हा पटकन कळतो. शब्दांच्या ठेवणीमुळे काव्य अधिक सरस बनतं; त्याचंच हे उदाहरण.
उदात्तता येते कुठून या बद्दल बोलताना Longinus म्हणतो की विचारांची भव्यता हा उदात्ततेचा मुख्य स्रोत आहे. टागोरांच्या विचारांमध्ये ही भव्यता नेहमी दिसते. विशेषकरून, त्यांच्या देशाला उद्देशून लिहिलेल्या कवितांमध्ये तर उदात्तता निश्चित दिसते. कवीने व्यक्त करावयाचे विचार त्याच्या काव्यामध्ये तेजस्वीपणे मांडले पाहिजेत. त्यांना योग्य शब्दांतून मांडले तरच त्या विचारांमागचा उद्देश वाचकापर्यंत पोचतो. देशाबद्दलची तळमळ टागोरांनी या कवितेमध्ये तेजस्वीपणे मांडलेली दिसते. Longinusच्या मते शब्दांचा योग्य वापर तसेच अलंकार आणि इतर काव्यशास्त्रातील गोष्टींचा योग्य वापर याने उदात्तता पूर्ण होते. टागोरांच्या या कवितेत त्याचा प्रत्यय पुरेपूर येतो.
काव्यात कुठल्या त्रुटी असू नये हे Longinus सांगतो. त्याच्या मते शब्द बंबाळ परंतु अर्थहीन काव्य नसावं. काव्य बालीश असू नये. त्यातून असत्य भावना व्यक्त होऊ नयेत. यासोबतच स्त्रीचे वांझत्व कधीही काव्यातून दिसू नये. टागोरांच्या काव्यात यापैकी कुठल्याच त्रुटी दिसत नाहीत. याउलट, टागोरांचे काव्य हे सदैव अर्थाने भारलेले असते आणि त्यांचे काव्य हे त्यांच्या मनातील उत्कट भावनांचा स्रोत असतात.
संस्कृत साहित्यातील ६ संप्रदायांचा विचार या कवितेमध्ये कशा पद्धतीने झाला आहे ते संक्षिप्त पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथम, भरतमुनींनी प्रवर्तिलेला रस संप्रदाय. भरतमुनींच्या मते ८ रस व त्याचे ८ स्थायी भाव आहेत. परंतु नंतरच्या काळात अभिनव गुप्त यांनी ९वा रस, शांत रस म्हणून मान्य केला. ही कविता माझ्या मते शांत रसातील आहे. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिली गेलेली ही कविता भारतीयांसाठी अजूनही प्रेरणादायी आहे. त्यातील विचार आचरणात आणण्याची गरज आजही आहे. ही कविता वाचून माणूस जागृक होतो व वास्तवाशी त्याचा थेट संबंध येतो.
ध्वनी संप्रदायाचा विचार करता हे काव्य माझ्या मते मध्यम काव्यांमध्ये गणले जाईल. या कवितेत व्यंग्यार्थ आहे. उदाहरणार्थ, Where knowledge is
free यातून असा अर्थ अभिप्रेत आहे की शिक्षणाचा हक्क सर्वांना असावा. त्यामध्ये जात-पात, धर्म, वय, मर्यादा, रंग, रूप या गोष्टी येऊ नयेत. यासोबतच इथे वाच्यार्थाला पण तेवढेच महत्त्व आहे. उदाहरणार्थ, Into that heaven of freedom, my Father, let my country awake यामध्ये वाच्यार्थच महत्त्वाचा आहे. माझा देश बंधनमुक्त होऊ दे असा अर्थ यामध्ये दिसतो.
रीति संप्रदाय म्हणजे गुणांचा समुदाय- शब्दगुण आणि अर्थगुण. शब्दगुणांपैकी यमक, अनुप्रास हे गुण या कवितेत नाहीयेत, परंतु वाक्याची रचना या मध्ये स्पष्टपणे दिसते. प्रत्येक वाक्याची सुरुवात 'where' या शब्दापासून होते. प्रत्येक वाक्यच्या रचनेतून हे स्पष्ट होते की एका चांगल्या गोष्टीची आशा करण्यात आली आहे. 'जिथे चित्त हे बंधनमुक्त आहे आणि मस्तक हे उंचावलेलं आहे' असं पहिल्या वाक्याचं ढोबळ भाषांतर होतं; याच पठडीत पुढील कविता आहे. अर्थगुणांपैकी ही कविता शांत रसातील आहे व यामध्ये अलंकार पण प्रयोजिले आहेत.
औचित्य याची 'उचितस्य भावः औचित्यम् |' अशी औचित्य संप्रदायींनी व्याख्या केलेली दिसते. अलंकार इ. गोष्टींचा उचित ठिकाणी केलेला वापर म्हणजे औचित्य. या कवितेमध्ये औचित्य कसे दिसतं ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पद औचित्य - योग्य शब्दाचा वापर. उदाहरणार्थ, Where knowledge is
free या वाक्यात free या शब्दाऐवजी इतर अर्थाचे शब्द न वापरता, हाच शब्द वापरण्यात आला. free हा शब्द सर्व समाविष्ट आहे. Where knowledge is
'open to all', 'accessed to everyone', 'given to all' असे शब्दसमूह न वापरता, एका शब्दामधून त्यांनी खूप मोठा आणि गहन अर्थ पोचवलाय.
वाक्य औचित्य - योग्य वाक्याचा वापर. उदाहरणार्थ, Where the words come
out from the depth of truth हे वाक्य माझ्या मते वाक्य औचित्याचं सर्वात मोठं उदाहरण असावं. माणूस जे बोलेल, ते सत्यच बोलेल या आशयाचं हे वाक्य आहे. परंतु याची रचना इतकी सुंदर केली आहे की या वाक्यातून शंका निर्माण होत नाही. Where each man speaks truth किंवा Where only truth is
spoken असं न म्हणता, 'सत्य बोलणे' या गोष्टीचा नियम न करता ती एक इच्छा म्हणून अतिशय योग्य पद्धतीने व्यक्त केली आहे.
यासोबतच इतर छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा गुण, अलंकार, रस, क्रिया, वचन, विशेषण, देश, काल, अभिप्राय, प्रतिभा, अवस्था, विचार हे औचित्य या कवितेत दिसतात.
अलंकार संप्रदायामध्ये अलंकाराचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यापैकी माझ्या मते या कवितेमध्ये 'अतिशय'अलंकार योजिलेले दिसतो. ही कविता अर्थपूर्ण असून, त्या अर्थापेक्षा अधिक काहीतरी अर्थ वाचकापर्यंत पोचतो.
'लोकातिक्रान्त गोचरता |' जे आहे त्याला ओलांडून बघणं म्हणजे वक्रोक्ती. स्वभावोक्तीतून वार्ता जन्माला येतात, परंतु वक्रोक्तीतून काव्य जन्माला येते. वक्रोक्ती जणू काव्याचा आत्मा आहे. जर एखाद्या साहित्यकृतीमध्ये वक्रोक्ती नसेल तर तिकडे स्वभावोक्ती असते; आणि जर स्वभावोक्ती असेल तर ते काव्य नाही. त्यामुळे निश्चितच या कवितेमध्ये वक्रोक्तीचा वापर केला आहे.
Comments
Post a Comment